धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्यासाठी सावरकरच जबाबदार – अय्यर

लाहोर – आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायमचं चर्चेत असणारे मणिशंकर अय्यर यांनी लाहोरमधील एका कार्यक्रमात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. धर्माच्या आधारे देशाचे विभाजन करण्यासाठी सावरकरच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान आता अय्यर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना अय्यर म्हणाले की, विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ मध्ये हिंदुत्व या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले. द्विराष्ट्राची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती, असे वादग्रस्त विधान काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते मणिशंकर अय्यर यांनी केले आहे.लाहोरमधील एका कार्यक्रमात मणिशंकर यांनी सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले. तसेच सावरकरांचे समर्थक सध्या भारतात सत्तेत असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

त्यांनी जिना यांचे कौतुक केल्याबद्दल भाजपाने अय्यर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. मी जिना यांचा उल्लेख कायदे आझम म्हणून केला. त्यावर मला पत्रकार विचारतात तुम्ही जिना यांचे कौतुक कसे काय केले?. मग पाकिस्तान मध्ये राहणारे अनेक जण गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा करतात. मग ते देशभक्त नाहीत का, असा सवालही त्यांनी केला आहे.