fbpx

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पहिल्या महिला सभापती सोनाली गव्हाणे

Sonali Gawane

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापतीपदासाठी भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी पहिल्यांदाच महिला सदस्या विराजमान होणार आहे. तसेच, उच्च शिक्षित आणि युवा महिला नगरसेविकेला शहरातील शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या शिक्षण मंडळावर सभापतीपदी काम करण्याची संधी मिळाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या नगरसेविका सोनाली गव्हाणे यांची शिक्षण मंडळ सभापतीपदी निवड निश्चित झाल्यानंतर आमदार लांडगे समर्थकांनी महापालिकेत जल्लोष केला.

महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप याच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, उपमहापौर शैलजा मोरे, इ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, विधी समितीच्या माजी सभापती शारदा सोनवणे, शहर सुधारणा समितीचे माजी सभापती सागर गवळी, सुवर्णा बुर्डे, अॅड. मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिक्षण समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सत्ताधारी भाजपकडून सोनाली गव्हाणे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी शर्मिला बाबर या दोघींचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. सभापती, उपसभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक सोमवारी (दि. 9) दुपारी एक वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत.

सोनाली गव्हाणे म्हणाल्या की, महापालिका शिक्षण मंडळावर सभापतीपदी काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांचे आभार मानते. शहरातील शैक्षणिक क्षेत्रात अनेक उणिवा आहेत. त्याबाबत सकारात्मक दृष्टीने काम करण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा, शाळांतील पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर आता भर देणार आहे. तसेच, दहावीतील नापासांची शाळा उपक्रम हाती घेण्यात येईल. पुण्याच्या धर्तीवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांच्या शाखा पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्याबाबत पक्षातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

महापालिकेत स्थापन होणार शिक्षण समिती

सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधनाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री

याही वर्षी पुण्यात पाहायला मिळणार भक्ती – शक्तीचा संगम