पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामना पुण्यात

पुणे- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेट सामन्याचे दि. 23 ते 27 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये आयोजित होणारा हा पहिला-वहीला आंतराराष्ट्रीय कसोटी सामना असून याव्दारे पुण्यातील क्रिकेट विश्‍वामध्ये आखणी एक मानाचा तुरा रोवला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभय आपटे आणि सचिव रियाझ बागवान यांनी दिली.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची (एमसीए) स्थापना 1934 मध्ये झाली आणि त्यानंतर 82 वर्षांनी पुणे शहरामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आयोजित होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची कसोटी मालिका ही ‘बॉर्डर-गावसकर करंडक’ म्हणून ओळखली जाणार आहे. स्थानिक खेळाडू केदार जाधव याने आपल्या जिगरबाज खेळीने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. केदारने केलेल्या या अलौकिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्याला कसोटी सामन्याचे पहिले तिकीट देऊन गौरविण्यात येणार आहे. एमसीएने या स्टेडियमवर आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, दोन आंतरराष्ट्रीय टी-20 व 25 इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) टी-20 सामने असे एकूण 29 आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या सर्व क्रिकेटपटूंना एमसीए तर्फे या कसोटी सामन्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरावा तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी या कसोटीचा लाभ घ्यावा, असा एमसीएचा मानस आहे. एमसीएच्यावतीने पुण्यातील सर्व शाळांना या कसोटी सामन्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच विकलांग शाळेतील मुलांसाठीही एमसीए तर्फे निमंत्रण देण्यात येणार आहेत.
क्रिकेटप्रेमींसाठी कसोटी सामन्याची तिकीट विक्री दि. 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. पीवायसी हिंदू जिमखाना आणि एमसीए स्टेडियम, गहुंजे येथील बॉक्स ऑफीस येथे प्रत्यक्ष तिकीट विक्री तसेच bookmyshow.com या संकेत स्थळावर ऑनलाईन विक्रीही होणार आहे. सामन्याचे सिझन तिकीट दि. 21 फेबु्रवारी पर्यंत विक्रीस उपलब्ध असणार आहे. प्रत्येक दिवसाचे तिकीट (जर शिल्लक असेल तर) 22 फेब्रुवारीपासून विक्रीस खुले करण्यात येणार आहे.
तिकीट विक्रीचे दर पुढीलप्रमाणे-
 ईस्ट स्टँड आणि वेस्ट स्टँडः सिझन तिकीट रूपये 1000/- व प्रत्येक दिवसाचे रू.400/-;
साऊथ अप्परः सिझन तिकीट रू.1500 व प्रत्येक दिवसाचे रू. 600/-;
साऊथ लोअरः सिझन तिकीट रू. 2500/- व प्रत्येक दिवसाचे रू. 1000/-;
साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टँडः सिझन तिकीट रू.2000/- व प्रत्येक दिवसाचे रू.800/-;
नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः सिझन तिकीट रू.2000/- व प्रत्येक दिवसाचे रू.800/-;
साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टँड सिझन तिकीट रू. 5000/- व प्रत्येक दिवसाचे रू.2000/-.
कॉर्पोरेट बॉक्सचे सिझन तिकीट 62,500/- आणि प्रत्येक दिवसाचे रू. 50,000/- असे शुल्क आहे.