नगरमध्ये शिवसैनिकांवर गोळीबार; दोन ठार

अहमदनगर: शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना सायंकाळी सहा वाजता केडगाव येथे भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. केडगाव येथील सुवर्णनगर येथे ही घटना घडली.

या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली. सध्या सुवर्णनगर परिसरात वातावरण तनावपूर्ण बनले असून, जादा पोलीस कुमक पाचारण करण्यात आली आहे. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी दोघा जणांनी त्यांच्यावर रिव्हॉलव्हरमधून गोळीबार केल्याचे समजते.

गोळीबाराच्या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. यावेळी स्थानिक व्यवसायिकांनी व रहिवाशांनी घरे व दुकाने बंद करून घेतली. या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याची शंका वर्तविण्यात येत असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

You might also like
Comments
Loading...