fbpx

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार, मद्यधुंद शिक्षकाने घरगुती वादामधून भावावर केला गोळीबार

crime

अहमदनगर/प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यातील गोळीबाराचे सत्र थांबण्याचे चिन्ह दिसत नसून जामखेड व केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच व त्यावरून अहमदनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे या गावात घरगुती वादातून चक्क एका शिक्षकाने आपल्या सख्ख्या भावावरच पुतणीच्या परवानाधारक रिव्हॉलव्हर मधून गोळीबार केल्याची घटना घडली असून सुदैवाने शिक्षक दारू पिऊन नशेत असल्याने नेम चुकल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु राखण करत असलेल्या कुत्र्यालाच नेम चुकल्याने पाठीमागच्या बाजूस गोळी लागली आहे.

गोळीबार करणारा आरोपी शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड हा पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथील असून शिक्षक म्हणून पाथर्डी तालुक्यातीलच कडगाव येथे नोकरीस आहे, त्याची पत्नी पण शिक्षक म्हणून नेवासा तालुक्यातील सोनई येथे नोकरीस असल्याने ते सोनई येथे कुटुंबासहित राहत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने व नातेवाईकांचे लग्न असल्याने ते मूळ गावी निवडुंगे येथे मुक्कामास आले होते.

सुमारे एक महिन्यांपूर्वी अहमदनगर येथे आरोपी शिक्षक उद्धव मरकड याचे त्याची सख्खी बहीण शांता भाऊसाहेब दहातोंडे हिच्या घरी भांडण झाले होते, त्या भांडणाचा राग उद्धव यास असल्याने नातेवाईकाच्या लग्नाला आलेल्या बहिणीने दुसरा भाऊ माजी सैनिक बाळासाहेब मरकड याच्या घरी मुक्काम केल्याचा राग धरून आरोपी शिक्षक उद्धवने भावावरच पहाटेच्या सुमारास पुतणीच्या परवानाधारक पिस्तूलमधून गोळी झाडली, सुदैवाने उद्धव दारूच्या नशेत असल्याने नेम चुकल्याने झोपलेल्या बाळासाहेब यांच्या पायथ्याला बसलेल्या कुत्र्याला पाठीमागच्या बाजूस गोळी लागली व बाळासाहेब यांचे प्राण वाचले. गोळीबाराचा आवाज झाल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले व उद्धव पळून गेला. गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल बाळासाहेब यांची पुतणी पुष्पा नीलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार) यांच्या नावावर असून त्यांनी हे पिस्तूल उद्धव यास वापरायला दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच शिक्षक असलेला भाऊ उद्धव हा कायमच दारूच्या नशेत असतो व त्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप फिर्यादी माजी सैनिक बाळासाहेब मरकड यांनी केला आहे.

परंतु परवानाधारक पिस्तुल दुसऱ्याकडे कसे काय दिले, तसेच कायद्याचा अजिबात धाक न बाळगता चक्क एका शिक्षकाने दारूच्या नशेतच सख्ख्या भावावरच गोळीबार केल्याने नक्कीच पोलिसांचा धाक आता गुंडांबरोबरच समाजात सभ्य समजणाऱ्या शिक्षकी पेशाला पण राहिला नसल्याचे या घटनेमधून दिसून येत आहे. गोळीबार करणारा आरोपी शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड याच्यासह त्याची पुतणी पुष्पा निलेश पानसरे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे करत आहेत.