“सेफ किड्स अॅट होम”च्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण.

पुणे :- सेफ किड्स फाऊंडेशन व हनीवेल यांच्या वतीने सेफ किड्स अॅट होम हा अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम पुणे शहरात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.  राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या या प्रकल्पाचा विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सेफ किड्स फाऊंडेशन तसेच हनिवेलच्यातर्फे करण्यात येत आहे.
१४ वर्षाखालील बालकांसाठी घरातील आग व भाजण्यासंदर्भातील अपघाताचा प्रतिबंध व त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सेफ किड्स अॅट होम हा कार्यक्रम सेफ किड्स फाऊंडेशनतर्फे हनीवेलच्या सहयोगाने राबवण्यात येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात सेफ किड्स अॅट होम प्रकल्पाच्या दोन वर्षाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात या कार्यक्रमाचा विस्तार करत आहोत . आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८० आदर्श शाळा व ५० आदर्श वस्त्या निर्माण करणार आहोत ज्या आग व भाजण्यापासून सुरक्षित असतील. अशे मत कार्यक्रम संचालिका डॉ. सिंथिया पिंटो यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. किरण गावडे यांच्यामते,  शहराच्या शाश्वत विकासासाठी, दुर्लक्ष अथवा अग्निसुरक्षेबाबतच्या अज्ञानामुळे होणा-या आगीच्या अपघातांचा प्रतिबंध व त्यांचे प्रमाण घटवण्याची आवश्यकता आहे.  अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करून आगीपासून प्राणहानी व वित्तहानी टाळण्याचा प्रयत्न करत असतात तरीसुध्दा अग्निसुरक्षेबद्दल समाजात जागरूकता वाढल्यास आगीस प्रतिबंध व आपत्कालीनसमयी त्वरित प्रतिसाद शक्य होणार आहे.”
सेफ किड्स अॅट होम कार्यक्रम फक्त बालकांच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून शासनाच्या १०० स्मार्ट शहर दृष्टीप्रमाणे नागरिक तसेच नागरी संस्था यांच्या समन्वयातून अग्निसुरक्षा संस्कृती शहरामध्ये रुजवण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच या कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे.