शहरातील ७० रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले, तेही फक्त सहा दिवसात?

औरंगाबाद : विरार येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर औरंगाबाद महापालिकेने सर्वच रुग्णालयांतील फायर सेफ्टी यंत्रणेची तपासणी सुरू केली आहे. पालिकेच्या पथकाने मागील सहा दिवसांत शहरातील ७० रुग्णालयांची तपासणी केली आहे. मात्र केवळ सहा दिवसात एवढ्या रुगाणालयांची तपासणी मनपाने कशी पूर्ण केली यावरच एकुण प्रश्नचिन्ह उपस्थित होतांना दिसत आहेत.

शहरातील या ७० रुग्णालयात काही ठिकाणी छोटछोट्या त्रुटी आढळल्या, तर काही ठिकाणी फायर सेफ्टीची यंत्रणा सज्ज असतांनाही प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभाव दिसून आला. त्यानुसार आता प्रत्येक रुग्णालयांना नोटिसा बजावून त्रुटींची पूर्तता करून घेतली जाणार असल्याचे अग्निशमन विभागप्रमुख आर.के. सुरे यांनी सांगितले आहे.

नाशिक व विरार येथील रुग्णालयांमधील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सर्व कोविड रूग्णालयांची आणि कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी (ऑडिट) करण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमले.

हे पथक रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती व आगीचे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे का, याची तपासणी करत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५६ रुग्णालयांची तपासणी करण्याचे ठरले होते. २६ एप्रिलपासून सुरू केलेल्या या तपासणीत मागील सहा दिवसांत ७० रुग्णालयांची तपासणी झाली आहे.

पालिकेच्या अग्निशमन विखभागाचे प्रमुख आर.के. सुरे यांच्या नेतृत्वात ही तपासणी केली जात आहे. पहिल्या दिवशी डॉ. दहिफळे कोविड सेंटर, डॉ. उकडगावकर कोविड सेंटर, गजानन हॉस्पीटल, जे.जे. हॉस्पीटल अदालत रोड या चार रुग्णालयांची तपासणी केली होती. संबंधित रुग्णालयांत आगीचा प्रकार घडल्यास प्राथमिक उपाययोजना करता येतील, अशी व्यवस्था होती. मात्र प्रशिक्षित कर्मचार्‍यांचा अभाव येथे दिसून आला.

महत्त्वाच्या बातम्या