सिंचन घोटाळ्या प्रकरणी एफआयआर; अजित पवार, सुनील तटकरेंच्या अडचणी वाढणार

नागपूर: नागपूरमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा संयुक्त जन आक्रोश- हल्लाबोल आंदोलन संपताच आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळा प्रकरणी तब्बल चार एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा सिंचन घोटाळा केला गेल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच्या जवळच्या कंत्राटदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी घोटाळ्याच्या फाईलींवर सह्या केल्याचं उघड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

तत्कालीन मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या काळात अनेक प्रकल्पांत घोटाळा झाल्याचा आरोप आपच्या प्रीती मेनन यांच्याकडून करण्यात येत होता. या प्रकरणी अँन्टी करप्शन ब्युरोकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात आहे. एफआयआरमध्ये कोणाकोणाची नावे आहेत हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान रायगडमधील बाळगंगा धरण घोटाळ्यातही यापूर्वीच सुनील तटकरेंची सुरू आहे. तसंच अजित पवारांचं नावही वारंवार सिंचन घोटाळ्याशी जोडलं जातंय. यामुळे तत्कालीन मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच दिसत आहे.Loading…
Loading...