शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवसेना खासदारावर गुन्हा

टीम महाराष्ट्र देशा: उस्मानाबाद मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप ढवळे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते कसबे तडवळे येथे राहण्यास होते. लोकसभा निवडणुकी दरम्यान धवळे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासह पाच जणांच्या नावे सुसाईड नोटमध्ये लिहिली होती.

दिलीप ढवळे यांनी १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती, कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमिन लिलावात काढली होती , या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

2010 मध्ये ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा कारखाना व्याजासकट कर्ज फेडेल, अशी हमी देत धवले यांच्या शेतीवर कर्ज उचलले होते. मात्र कारखान्याने पैसे न भरल्याने जमिनीचा तीन वेळेस लिलाव पुकारण्यात आला होता. ढवळे यांच्या खिशात दोन सुसाईड नोट सापडल्या होत्या.

एका चिठ्ठीत “ माझ्या आत्महत्येला ओमराजे निंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार आहेत.” तसेच दुसऱ्या चिट्टीत, “१३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखान्याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही.” असा उल्लेख करण्यात आला होता. ओमराजे निंबाळकरांना मतदान करु नका, असे आवाहनही या सुसाईड नोटमधून करण्यात आले होते.

दरम्यान, आता ओमराजे निंबाळकर यांच्यासह त्यांच्या मातोश्री आनंदीदेवी पवनराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक यांच्यासह तेरणा कारखाना, जयलक्ष्मी शुगर आणि वसंतदादा बँकेचे सर्व संचालक अशा 55 लोकांवर कलम 306, 406,409,420,120ब आणि 34 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.