भाजप सहयोगी खासदार संजय काकडेंच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : भाजपचे सहयोगी खासदार आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय काकडें यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू कोपरे गावठाणमधील स्थानिकांची जमीन बळकावल्याचा आरोप काकडे यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी खासदार संजय काकडे यांच्या सह त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे तसेच इतर संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वारजे पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
संजय काकडे यांचे भाऊ सुर्यकांत काकडे यांना न्यू कोपरे ग्रामस्थांनी 14 एकर जमीन विकसनासाठी दिली होती. मात्र जमिनीच्या कागदपत्रात खाडाखोड करून एकूण 38 एकर जमीन घेण्यात आली. त्यातील सात एकर जमीन महापालिकेला ‘ऍमिनीटी स्पेस’ म्हणून.. तर बाकीची म्हणजेच गावकऱ्यांच्या मालकीची 17 एकर जमीन बेकायदेशीरपणे बळकावण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या विरोधात न्यू कोपरे ग्रामस्थांकडून लढा उभारण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काकडे यांच्या घरा समोर युक्रांदच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. आता स्थानिक नागरीक दिलीप मोरे यांनी दाखल केलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिवाजीनगरच्या प्रथम वर्ग न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात गावकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.