आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात जीवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल

blank

अहमदनगर / प्रशांत झावरे : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या अहमदनगर मधील केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांडानंतर नगरमध्ये गुन्हेगारी वातावरण वाढले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करून वातावरण चिघळत ठेवले. या प्रकरणी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले. आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलीस तपास नंतर सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. आता वातावरण शांत झाले असे वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांची यात भर पडली असल्याने आता पुढे काय होणार, संघर्ष आणखी वाढणार का याची चिंता पोलीस दलासह सामान्य नागरिकांनाही सतावत आहे.

आता तब्बल दीड महिन्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे सुपुत्र नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांसह संदीप गुंजाळ, मयूर राऊत व माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान मतदानाच्या दिवशी हा गुन्हा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांना केडगाव हत्याकांडानंतर अटक करण्यात आली होती, जगताप आता न्यायालयीन कोठडीत असून हत्याकांडाचा तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले असतानाच आता याप्रकरणी त्यांच्यावर आणखी एक अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हा गुन्हा नोंदविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी तशाच स्वरूपाचा गुन्हा शिवसेना नगरसेवक योगीराज गाडे यांच्याविरुद्ध नोंदवला आहे. मंगळवारी सायंकाळी गाडे यांनी बोरकर यांना ‘तू जास्त गडबड करू नकोस, नाहीतर तुला जीवे मारील’ अशी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना परत आमने सामने आले असल्याचे चित्र दिसत असून आता हा संघर्ष परत वाढणार आहे.