fbpx

आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल होणार

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. तसे आदेश निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आता वाढणार आहेत.

धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहिरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला आहे असं तपासात सिद्ध झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरमाना प्रसिद्ध करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामुळेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीविरोधात तक्रार करण्यात आली होती. कारण आचारसंहिता लागू असताना सरकारी मालमत्तेचा वापर करता येत नाही.

तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले होते. तपासाअंती सरकारी बंगल्याचा गैरवापर झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पोलीस आता याबाबत कारवाई करतील, अशी माहिती निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.