जाणून घ्या थोडासा जरी पाऊस झाला तरी वीजपुरवठा खंडित का होतो ?

Electricity

पुणे : येत्या काही दिवसांतच मान्सूनच्या पावसाला सुरवात होईल. कोरोना विषाणूच्या सावटात यंदाच्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून सावध राहण्याची अधिक गरज आहे. त्याचप्रमाणे घरातील वीज उपकरणे व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हे सर्व सुरु असताना एक त्रास कायम असतो तो म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्याचा. तर आज आपण जाणून घेणार आहोत थोडासा जरी पाऊस झाला तरी वीजपुरवठा खंडित का होतो ? महावितरण पुणे येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणारे निशिकांत राऊत यांनी यासंदर्भात जनहितार्थ माहिती जारी केली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार उद्यापासून कोकण दौऱ्यावर

वीजपुरवठा खंडित होण्याची विविध कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हाळ्यात चिनीमातीचे हे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. उन्हाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही. परंतु, पावसाला सुरवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधला जातो. दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट करणे आदी कामे करावी लागतात. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत या कामांमध्ये व्यत्यय येत असल्याने वीजग्राहकांची विजेअभावी गैरसोय होते.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारणे म्हणजे वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे किंवा तिच्या कडकडाटाने दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी आदी यंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवर कर वाढवा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येते. याशिवाय मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईट किंवा ट्वीटरद्वारेही तक्रारी स्विकारल्या जातात. याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्याची सोय आहे. महावितरणकडे वीजग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. तसेच ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून NOPOWER<space><Consumer Number> हा ‘एसएमएस’ महावितरणच्या 9930399303 या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल.