जाणून घ्या देशभरात वेगाने फैलावत असलेल्या ‘बर्ड फ्ल्यू’ची सध्या नेमकी काय आहे स्थिती ?

bird flu

नवी दिल्ली : देशात 11 जानेवारी 2021 पर्यंत दहा राज्यात बर्ड फ्लू अर्थात एव्हियन एनफ्लूएन्झाची पुष्टी झाली आहे. आयसीएआर- एनआयएचएसएडी या प्राणी रोग विषयक राष्ट्रीय संस्थेने राजस्थान मधल्या टोंक, करौली, भिलवाडा जिल्ह्यात आणि गुजरातमधल्या वलसाड, वडोदरा आणि सुरत जिल्ह्यात कावळे, स्थलांतरित पक्षी /वन्य पक्ष्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. उत्तराखंडमधल्या कोट्द्वार आणि डेहराडून जिल्ह्यातही कावळ्यांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला आहे. नवी दिल्लीत कावळे आणि दिल्लीतल्या संजय तलाव परिसरात बदके मृत्युमुखी पडल्यचे वृत्त आहे.

याशिवाय महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या कुक्कुट पालन केंद्रात एव्हियन एनफ्लूएन्झाचा प्रादुर्भाव आढळला असून मुंबई, ठाणे, दापोली आणि बीड मध्ये कावळ्यांमध्ये याची पुष्टी झाली आहे. रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी संसर्ग झालेले पक्षी नष्ट करण्याचे काम हरियाणामध्ये सुरु आहे. केंद्रीय पथकाने हिमाचल प्रदेशाला भेट दिली असून हे पथक साथरोगाविषयी पाहणी करणार आहे.

राज्यांनी जनतेमध्ये जागृती करावी आणि अपप्रचार रोखावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्राणी संग्रहालये, पक्ष्यांचा बाजार, कुक्कुटपालन केंद्रे, इथे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अधिक सतर्क राहावे. मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासह कुक्कुटपालन केंद्रात जैव सुरक्षितता मजबूत करण्याचेही सुचवण्यात आले आहे.

बाधित पक्षांना नष्ट करण्यासाठी पुरेसे पीपीई संच आणि आवश्यक सामग्री राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रोगाच्या स्थितीबाबत राज्यांच्या पशु पालन विभागानी काटेकोर लक्ष ठेवण्याबरोबरच आरोग्य प्रशासनाशी समन्वय राखावा आणि हा रोग मानवामध्ये पसरण्याची कोणतीही शक्यता टाळावी याची खातरजमा करण्याचे निर्देश दुग्ध विकास आणि पशु पालन सचिवांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या