कॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांसाठी खासदार काकडेंनी घेतली अर्थमंत्री जेटलींची भेट

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक प्रश्न व विकासासंदर्भात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामांसाठी निधी देण्यासंदर्भात आपण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लवकरात लवकर बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी यावेळी दिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या व प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात खासदार संजय काकडे यांची नुकतीच नगरसेवकांसोबत बैठक झाली होती. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन अर्थमंत्री जेटली यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, रुपाली बिडकर, किरण मंत्री, विवेक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान खासदार संजय काकडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासमोरील एलबीटी रद्द होऊन जीएसटी सुरु झाल्यानंतर निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, प्रलंबित विकासकामे तसेच महापालिकेप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही राज्य व केंद्राकडून विविध विकास योजनांसाठी निधी मिळण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अर्थमंत्री जेटली यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अर्थमंत्री जेटली यांनी खासदार संजय काकडे व शिष्टमंडळाला दिले.

जीएसटी सुरु होण्यापूर्वी एलबीटीच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये मिळायचे. जीएसटी सुरु झाल्यापासून एलबीटीचे 150 कोटी रुपये बंद झाले. आता कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कर व इतर सर्व कर मिळून 97 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापोटी मिळतात. तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वार्षिक खर्च 131 कोटी रुपये होत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला 34 कोटींचा तोटा होत आहे. एलबीटीपोटी मिळणारी रक्कम बंद झाल्याने कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट झाली. दोन वर्षांत विकास कामांसाठी बोर्डाच्या 100 कोटीच्या मुदत ठेवीतील सुमारे 70 कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे 30 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी व येथील मुलभूत सुविधांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी केंद्राकडून 100 कोटी रुपये मिळायला हवेत. अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या आजच्या बैठकीत ही सर्व परिस्थिती खासदार काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्या निदर्शनास आणून दिली.