सर्व पक्षीय नगरसेवकांसोबत अर्थमंत्री जेटली यांची खासदार काकडे घेणार भेट

पुणे: कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्या सोडविणे व प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासंदर्भात आता राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे 3 जानेवारीला भेटीची वेळ मागितली आहे. भेटीची वेळ मिळाल्यास पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या सर्व पक्षीय सदस्यांना सोबत घेऊन खासदार काकडे दिल्लीकडे कूच करणार असून अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहेत.

खासदार संजय काकडे यांनी आज पुणे कॅन्टोन्मेंटच्या सर्व सदस्यांसोबत येथील प्रलंबित विकासकामे व समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जीएसटी सुरु होण्यापूर्वी एलबीटीच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये मिळायचे. जीएसटी सुरु झाल्यापासून एलबीटीचे 150 कोटी रुपये बंद झाले. आता कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कर व इतर सर्व कर मिळून 97 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापोटी मिळतात. तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वार्षिक खर्च 131 कोटी रुपये होत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला 34 कोटींचा तोटा होत आहे. एलबीटीपोटी मिळणारी रक्कम बंद झाल्याने कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट झाली. दोन वर्षांत विकास कामांसाठी बोर्डाच्या 100 कोटीच्या मुदत ठेवीतील सुमारे 70 कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे 30 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी व येथील मुलभूत सुविधांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी केंद्राकडून 100 कोटी रुपये मिळायला हवेत. सर्व पक्षीय नगरसेवक व बोर्डाचे चीफ अकाउटंट यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये ही वस्तुस्थिती मांडली.

विकासकामांसाठी सध्या पुरेसा निधी नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहतात व नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागते. केंद्राने दुर्लक्ष केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे दैनंदिन खर्चासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत. त्यामुळे खासदार काकडे यांनी याकामी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नगरसेवकांनी या बैठकीत खासदार काकडे यांच्याकडे केली. त्यानंतर खासदार काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्याकडे याकामी भेटण्यासंदर्भात वेळ मागितली आहे.

कॅन्टोन्मेंट मधील समस्यांप्रकरणी झालेल्या बैठकीस पुणे कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा प्रियांका शिरगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, शैलेश बिडकर, मथुरावाला, किरण कांबळे, मनोहर कुरेशी, देविदास सोनटक्के, डॉ. भारत वैरागे, मनीष साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

करापोटी केंद्राकडे जमा होणाऱ्या महसुलातून महापालिकेप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही योग्य प्रमाणात विकासनिधी मिळावा ही तेथील नगरसेवकांची मागणी योग्य आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्या, प्रलंबित विकासकामे आणि मिळणारा निधी याची विसंगत असलेली वास्तव परिस्थिती अर्थमंत्री जेटली यांच्यासमोर मांडण्यासाठी खासदार संजय काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्याकडे वेळ मागितली. त्यांच्या भेटीची वेळ मिळाल्यास सर्व पक्षीय नगरसेवकांना घेऊन खासदार काकडे दिल्लीला जाणार आहेत.