अखेर भाजपच्या मदतीने एनपीपी मेघालयात सत्तेवर

conrod sangama

शिलॉंग: नॅशनल पीपल्स पार्टीने अखेर भाजपच्या मदतीने मेघालयात सत्ता स्थापन केली. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कॉनराड संगमा यांनी आज (मंगळवार) मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कॉनराड संगमा हे माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे पुत्र आहेत.

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे ४, एनपीपीचे १९, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे ६, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आणि भाजपचे प्रत्येकी २, तसेच एका अपक्ष आमदाराचा सरकारमध्ये समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. यामध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसने ५९ पैकी २१ जागा जिंकल्या पण बहुमतासाठी त्यांना दहा जागा कमी पडल्या. एनपीपीला १९ जागा मिळाल्या असून, संगमा यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन ३४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र सादर करत सरकार स्थापण्याचा दावा केला होता. अखेर भाजपच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली आहे.

राज्यपाल गंगा प्रसाद यांनी सोमवारी राज्यात सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आज त्यांचा शपथविधी झाला. संगमा यांच्यासह नव्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांचा शपथविधी यावेळी झाली. माझ्याकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे राज्यपालांनी मला सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले, असे संगमा यांनी स्पष्ट केले होते.