अखेर पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ८.३३ टक्के बोनस देण्यास संचालक मंडळाची मंजुरी 

PMPML, Pune
पुणे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण एवढे दिवस सुरु असलेला दिवाळी बोनसचा वाद मिटला असून आता कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के  बोनस देण्यात येणार आहे. आज झालेल्या  पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा बोनस देण्यासाठी पुणे महापालिका १९ कोटी तर पिंपरी महापालिका १२ कोटी रुपये पीएमपीएमएलला देणार आहे.
पीएमपी तोट्यात असून, कर्जबाजारी असल्याने कर्मचा-यांना यंदा सानुग्रह अनुदान व बोनस देण्यात येणार नसल्याचे मुंढे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. त्यामुळे महामंडळातील कर्मचारी संघटनांनी औद्योगीक न्यायलयात धाव घेतली होती. न्यायालयाचे सभासद एस. व्ही. सुर्यवंशी यांनी सर्व कर्मचा-यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान व १२ हजार रुपये बक्षीस देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे पीएमपी प्रशासन नक्की काय भूमिका घेते याकडे कर्मचा-यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंढे यांनी आपली भुमिका ठेवल्यामुळे  पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. दरम्यान कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बोनस मिळण्यासाठी आंदोलन छेडले होते. अखेर आज संचालक मंडळाने बोनस देण्यास मंजुरी दिल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे.