‘त्या’ शिवसेना आमदारामध्ये आणि भुजबळांमध्ये अखेर पॅचअप

bhujbal and shivsena

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने कहर माजवल्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. नुकसानग्रस्तांना आपत्कालीन निधीतून मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. काल छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली होती.

तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरून वादावादी झाली. सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. ज्याप्रमाणे सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असा शब्द दिला. मात्र, या दरम्यान दोन्ही नेत्यांचा पारा चढला आणि वादावादी झाली.

आता या दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले असून वाद मिटल्याचे समोर आले आहे. साप्ताहीक कोरोना आढावा बैठकीनंतर भुजबळ-आमदार कांदे आणि जिल्हाधिकारी मांढरे यांच्यात सुमारे पाऊण तास नियोजन भवनाच्या बंद दाराआड चर्चा झाली. सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार असून याच मतदार संघात त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता.

दरम्यान, ‘पालकमंत्री छगन भुजबळ साहेब हे आमच्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहे. आमच्यात वैयक्तीक वादाचा विषय नाही. मतदार संघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मी शनिवारी बोललो. २०२१ च्या शासन निर्णयानुसार, राज्यातील इतर पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत झाली. मग नांदगावला का नाही. हा विषय होता. मात्र त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला प्रस्ताव पाठवून मदतीचे आश्वासन दिले आहे,’ असं भाष्य सुहास कांदे यांनी केलं आहे. नांदगावच्या पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीतून ५ टक्के आपत्तकालीन निधी मिळत नाही ही आमदार कांदे यांची भावना असून हे या वादाचे मूळ होते.

महत्त्वाच्या बातम्या