अखेर ऐंशी वर्षांपासूनची मागणी पूर्ण; महाराष्ट्राला मिळणार पहिलं मराठी विद्यापीठ

marathi vidyapith mumbai

मुंबई : ऐंशी वर्षांनंतर मराठी विद्यापीठाला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईतील वांद्रे भागात राज्यातलं पहिलं मराठी अभिमत विद्यापीठ स्थापन होणार आहे. उद्या (मंगळवारी) मराठी राजभाषा दिनाच्या मुहूर्तावर विद्यापीठासाठीच्या जागेचं हस्तांतरण होणार आहे.

राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी गेल्या ८० वर्षांपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून केली जात आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे. अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक वेळा करण्यात होती. अखेर मराठी विद्यापीठाला मुहूर्त मिळाला असून उद्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिना निमित्त मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते या जागेचा हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम विधानभवनात होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभे राहणार असून आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात हे सुरू व्हावे. म्हणून भाजपाचे आमदार आशिष शेलार प्रयत्नशील होते. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला आणि हॉटेल ताज या वास्तूंच्या मधल्या जागेत मराठी अभिमत विद्यापीठ तयार होणार आहे. अन्य राज्यांमध्ये त्या-त्या भाषांची विद्यापीठं आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंदी विद्यापीठ आहे, मात्र आजपर्यंत मराठी भाषेचं विद्यापीठ नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हे अभिमत विद्यापीठ ग्रंथाली वाचक चळवळीने पुढाकार घेऊन हे स्थापन करायचं ठरवलं.