मोठी बातमी : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्धव ठाकरे उद्या सर्व कुलगुरुंशी चर्चा करणार

udhav

मुंबई : राज्यातील विदयापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सर्व कुलगुरुंशी चर्चा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतील असा विश्वास देखील सामंत यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाही आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे, हे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे, असेही राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

तर दुसरीकडे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची मागणी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. या मागणीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राधिकरण सदस्यांनी विरोध केला आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द केली तर शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा मोठा परिणाम होईल. कोणताही पुढचा मागचा विचार न करता विद्यापीठांच्या विविध स्तरांतील तळज्ञांसोबत सल्लामसलत न करता अशा प्रकारची केलेली मागणी म्हणजे चर्चेत राहण्याचा प्रकार आहे की काय, असा प्रश्न विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला आहे.