मनसेच्या एकमेव आमदाराविरोधात गुन्हा दाखल

blank

पुणे : राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शंकर भवारी यांनी माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याची बेकायदशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करणारी गाडी पकडली होती. आमदार सोनवणे यांच्या कार्यकर्त्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यावर रीतसर कारवाई केल्याचा राग मनात धरला होता.
पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे या आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये काम करत होत्या. त्यावेळी गुरूवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आमदार सोनवणे तेथे आले असता, पोलिस स्टेशनला जमविलेल्या ४० ते ५० लोकांसमोर व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसमक्ष डमाळे यांना अर्वाच्य भाषेत अपमानीत केले.

शासकीय काम करत असताना दबाब आणून शासकीय कामापासून परावृत्त केल्याच्या कारणावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन आमदार शरद सोनवणे यांच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क.३५३,५०९,१८६,२९४ अन्वये रितसर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे करत आहेत.