‘दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात मी बोलणारच!’

‘दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात मी बोलणारच!’

रत्नागिरी : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील शिरुर कासार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी युवक अघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी याबाबत तक्रार दिली. शेख यांच्यावर औरंगाबादेत दाखल एका बलात्काराच्या प्रकरणावरून भाजपने त्यांच्याविरोधात रान उठवले होते. विशेषतः भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या त्यात आघाडीवर होत्या.

या तक्रारीवर चिपळून दौऱ्यावर असलेल्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा असे आव्हान त्यांनी दिले आहे.

त्या म्हणाल्या की, आज मी चिपळूणला आहे. मला अनेकांचे फोन येत आहेत की शिरूर कासार येथे मेहबूब शेखच्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. पण महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा. पण मी बोलत राहणार. लढणार आणि जिंकणार पण अशी प्रतिक्रिया वाघ यांनी दिली आहे.

मेहबूब शेख यांनी तक्रारीत काय म्हटले आहे?
बीड जिल्ह्यातील शिरूर येथील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पवार यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर कार्यकर्ते हजर होते. यावेळी चित्रा वाघ यांनी माझ्या बदनामीच्या उद्देशाने मी एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला. तसेच राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही असे म्हटले. वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला’ असे मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर सव्वा महिन्यापूर्वी औरंगाबादच्या तरुणीने अत्याचाराचे आरोप केले होते. दरम्यान, तांत्रिक तपासात शेख यांच्याविराेधात कुठलाही सबळ पुरावा हाती लागला नसल्याचा औरंगाबाद पोलिसांचा दावा आहे. यासंदर्भात विविध पक्षांसह संघटनांनी देखील योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, गुन्हा दाखल होऊन देखील मेहबूब शेख यांना अटक करण्यात आलेली नाही. यानंतर राजकीय पुढारी असल्याने पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप पीडितेने केला होता. यावरून तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. या प्रकरणात पिडीत महिलेची बाजू ऐकून घेत न्यायालयाने तपास करणाऱ्या पोलिसांवर ताशेरे ओढले होते.

महत्वाच्या बातम्या