बच्चू कडू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुवर्णकार समाजाची मागणी

बच्चू कडू

नाशिक : शहरातील रसिका आणि आसिफच्या आंतरधर्मीय विवाहाला पाठींबा देणाऱ्या  शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात सुवर्णकार समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. कडू  यांनी नाशिक येथे हिंदू सुवर्णकार समाजाविषयी केेलेल्या वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली असून, त्यामुळे व्यतित होऊन समाजाचे प्रतिनिधी ह.भ.प. सुनील मधुकर माळवे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा आरोप करीत सुवर्णकार समाजाने बच्चू कडू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कडू यांनी समाजाची जाहीर माफी मागावी आणि राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी सुवर्णकार समाजाच्या वतीने आंदोलन  करण्यात आले यावेळी ही मागणी करण्यात आली आहे. कडू यांच्या विधानाने व्यथित झाल्यामुळे महाराष्ट्र लाड सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त सुनील माळवे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा करीत कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बच्चू कडू यांनी नाशिक येथे संपूर्ण हिंदू सुवर्णकार समाजाबद्दल खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या निषेधार्ह वक्तव्यामुळे समाजाची बदनामी झाली असा देखील आरोप यावेळी करण्यात आला. बच्चू कडू यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा तसेच त्यांनी मीडियासमोर जाहीर माफी मागावी व राज्यमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी या समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

रसिका हिला सोनार समाज स्विकारीत नसल्याने आडगावकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे, हे धादांत खोटे आहे. समाजाने रसिकासाठी वेळोवेळी चांगली स्थळे दाखविली होती. मात्र, आडगांवकर कुटुंबीयांनी सातत्याने सर्व स्थळांना नकार दिला. रसिकासाठी दाखविलेल्या समाजातील तरुणांना आम्ही समोर आणण्यासदेखील तयार आहोत. बच्चू कडू यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक होते. मात्र, निव्वळ प्रसिध्दीसाठी संपूर्ण हिंदू सोनार/सुवर्णकार समाजाला लक्ष्य कले. नालायक, पाखंडी, अधर्मी, चांडाळ चौकडी, तिकडे जाऊन मरा ना, अशी भाषा राज्यमंत्र्यांना शोभणारी नाही असं देखील आंदोलकांनी म्हटले आहे.

यावेळी लाड सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष सुनील महालकर, अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, लाड सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राजीव शहाणे, ओम लोड सुवर्णकार समाज संस्था सिडकोचे अध्यक्ष विजय महाले, सुरेखा लोळगे, सारिका नागरे आदींनी बच्चू कडू यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनात सहभाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP