बारामती : अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची

blank

टीम महाराष्ट्र देशा- काल कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं .हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत बारामतीत अजित पवारांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे. हा वाद अक्षरश: मुद्यांवरुन गुद्यांवर आल्याने अजित पवारांनी  तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांना तंबी दिल्याची चर्चा आहे.

सध्या बारामतीत विकासकामांपेक्षा पक्षाअंतर्गत चालणाऱ्या कुरघोडींमुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चर्चेत आहे. गटबाजीवरुन अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी आणि नगरसेवकांना गटबाजीच्या मुद्द्यावरून चांगलचं झापलं. या बैठकीत दोन नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद मुद्यांवरुन गुद्यांवर आला. या प्रकारावरुन अजित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांना तंबी दिल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान,काल कागलमध्ये पार पडलेल्या परिवर्तन यात्रेदरम्यान अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक हे भाषणाला उभे राहिले असताना, त्यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला.राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील कार्यकर्त्यांनी खासदार महाडिकांच्या भाषणाला विरोध केला. त्यामुळे भाषण सोडून महाडिक यांना बाजूला बसण्याची वेळ आली.