नगरमध्ये शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये हाणामारी

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पक्षांतरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. यानिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते अहमदनगरमध्ये आले होते.

यानिमित्त नगरमध्ये त्यांची सभा पार पडली. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शरद पवार यांनी सभेला संबोधित केल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले.

यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही गटातील वाद हा पोलीस ठाण्यात गेला आणि नंतर हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेत्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली त्यामुळे आता हा वाद निवळला आहे.

दरम्यान या घटनेमुळे नगर शहरातील राष्टवादी काँग्रेसमध्ये कळमकर-जगताप गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत त्याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत दोनही गटांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसू शकतो.