FIFA World Cup 2018 : जगज्जेतेपदाचा फैसला आज

टीम महाराष्ट्र देशा : महिनाभर रंगलेले वर्ल्डकप फुटबॉलमधील जगज्जेतेपदासाठीचे युद्ध आता ६३ झुंजींनंतर अंतिम टप्प्यावर आले आहे. जेतेपदासाठी आज, रविवारी मॉस्कोमध्ये फ्रान्स आणि क्रोएशिया हे संघ आमने उभे ठाकले आहेत. या अंतिम लढतीकडे जगभरातील फुटबॉलचाहत्यांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत विजयश्री पटकावून क्रोएशिया नवा इतिहास रचणार की तब्बल वीस वर्षांच्या खंडानंतर फ्रान्सला पुन्हा विजयपताका फडकावता येणार, याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात दाटून आली आहे.

यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये सर्व लढती जिंकणारा क्रोएशिया हा एकमेव संघ होय. गट फेरीत नायजेरिया, अर्जेंटिना व आइसलॅण्ड या संघांचा पराभव केल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंड या संघांना हरवून अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला फ्रान्सने गट फेरीत ऑस्ट्रेलिया व पेरू यांचा पराभव केला, तर डेन्मार्कशी त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. मात्र त्यानंतर अर्जेंटिना, उरुग्वे व बेल्जियम या तगडय़ा संघांचा पराभव करून फ्रान्सने अंतिम फेरीत धडक दिली.

आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषकांमध्ये केवळ आठच देशांना विश्वविजेतेपद पटकावता आले आहे. त्यामुळे अवघ्या २० वर्षांपूर्वी ‘फिफा’ विश्वचषकात प्रथमच दाखल झालेल्या क्रोएशियाच्या संघाने अंतिम सामन्यापर्यंत मारलेली मजल ही समस्त फुटबॉलविश्वाला चकीत करणारी ठरली आहे.

फिफा वर्ल्ड कप 2019 : विजय जल्लोष साजरा केल्यानंतर मॅराडोना पडला बेशुद्ध

1 Comment

Click here to post a comment