fidget spinner….आगीतून फुफाट्यात!

छायाचित्रात दाखवलेली गोष्ट आहे fidget spinner. हल्ली वरचेवर आपल्या नजरेला पडणारी ही गोष्ट. फ्लिपकार्ट ते स्टेशन बाहेरचा फूटपाथ वर सध्या सगळीकडे या स्पिनर्स ची जोरदार विक्री चालू आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या कित्येक मुलांच्या हातात हे आधुनिक सुदर्शन चक्र सहज दिसेल. २०१७ सालचं सगळ्यात लोकप्रिय खेळणं असल्याचा मान या स्पिनर्स ने पटकवलाय. एवढं आहे तरी काय यात? तर म्हणे हे चक्र फिरवत बसल्याने स्ट्रेस जातो! हे आमच्या लोकांनी ऐकलं आणि मग काय विचारता; जागोजागी ही चक्र गरागरा फिरायला लागली. इतकी; की यातून वीज निर्मितीसाठी काही सोय केली तर अवघ्या देशाचा विजेचा प्रश्न सुटेल!

चिंता, ताणतणाव इतकंच नाही तर autism, ADHD यांसारख्या मानसिक समस्यांवरही हे स्पिनर्स उपचार म्हणून काम करतात असं सर्रास कानावर पडत असलं तरी हा फक्त मार्केटिंग फ़ंडा आहे. प्रत्यक्षात तसं काही होतं हे सिद्ध करणारं एकही संशोधन झालेलं नाही. किंबहुना; या स्पिनर्समुळेच विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासात लागत नसल्याचं लक्षात आल्याने अमेरिकेतील अनेक शाळांनी या स्पिनर्सवर चक्क बंदी घातली आहे. अशी बंदी आमच्याकडे घातली असती तर; ‘विद्यार्थ्यांनी काय खेळावं हेही आता शाळा ठरवणार का?’ अशा चर्चा आमच्या वृत्तवाहिन्यांनी रंगवल्या असत्या हा भाग निराळा. रस्त्यातून चालताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात होणे ही गोष्ट आपल्याकडे तरी नवीन नाही. त्यात आता या स्पिनर्सचीही भर पडणार आहे इतकंच.

मनाची चंचलता ही वाताची देण आहे असं आयुर्वेद सांगतो. वात हा सतत संचारी आहे. त्याला शांत करायचं असेल तर शरीर व मनाला स्थैर्य दिलं पाहिजे. मनाला स्थिर करायचं असेल तर ध्यान, जप यांच्यासारख्या शांतपणे बसून करण्याच्या क्रियांचा लाभ उत्तम होतो. तुमचा देवावर विश्वास असो वा नसो; तुम्ही या दोन्ही गोष्टी करू शकता. याशिवाय भ्रामरी, ओंकार ध्यान किंवा आयुर्वेदातील शिरोधारा यांचाही उपयोग केला जाऊ शकतो. मात्र मुळातच गतिमान असलेल्या स्पिनर्स मुळे हे स्थैर्य मिळणं अशक्य. किंबहुना; त्याचंच व्यसन लागण्याची शक्यता अधिक. जगभरातल्या अनेक नामवंत मानसोपचार तज्ज्ञांनी हेच मत नोंदवलं आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी म्हणून हे स्पिनर्स वापरायचे असतील तर आगीतून फुफाट्यात अशीच स्थिती होईल.

त्यातून या खेळण्याचे खोके पहा. बहुतेक वेळा Made in China हे शब्द दिसतील. आपल्याकडचा माल खपवण्यासाठी त्याला आरोग्याची जोड देण्याची ही चीनी मार्केटिंग ड्रॅगनची नवी खेळी आहे; तिला बळी पडू नका. अगदीच टाईमपास हवा म्हणून क्वचित कधीतरी खेळणं म्हणून fidget spinner चा वापर करायला हरकत नाही. मात्र ते खरेदी करत असताना Made in China नाहीत नं याची आवर्जून खात्री करा. या चायनीज उत्पादनापेक्षा आपली देशी १०८ मणी/ रुद्राक्षांची माळ कधीही स्वस्त आणि मस्त. फारच ताण तणाव जाणवत असेल तर माळ घेऊन रामनाम जपा!

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥

 

लेखक
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

 

You might also like
Comments
Loading...