फेसबुकवर पेड सबस्क्रीप्शनची सुविधा

facebook paid subscription

फेसबुकने आता जगभरातील मीडिया हाऊसेसला दिलासा देत पेड सबस्क्रीप्शनची सुविधा देण्याचे संकेत दिले असून खुद्द मार्क झुकरबर्ग यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

जगभरातील प्रसारमाध्यमे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. विशेष करून यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटच्या मदतीने व्यापक प्रमाणात शेअरिंग होत असल्याने याला सर्व मीडिया हाऊसेसने प्राधान्य दिले आहे. फेसबुकवरील पेजेसच्या माध्यमातून बहुतांश वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, न्यूज पोर्टल्स आदी आपापले कंटेंट शेअर करत असतात. प्रसारमाध्यमांना हे शेअरिंग सुविधाजनक व्हावे यासाठी फेसबुकने अनेक सुविधा दिल्या आहेत. यात ‘इन्स्टंट आर्टीकल्स’ हे प्रमुख आहे. यात कोणत्याही लिंकवर क्लिक केल्यावर ती संबंधीत साईटवर रिडायरेक्ट होण्याऐवजी फेसबुकवरच खुलते. याच्या माध्यमातून दाखविण्यात येणार्‍या जाहिरातीतून येणारे उत्पन्न हे संबंधीत लिंक शेअर करणारी मीडिया संस्था आणि फेसबुक यांच्यात विभाजीत करण्यात येते. अर्थात आजवर विशिष्ट रक्कम घेऊन वृत्त वाचणे अथवा पाहण्याची सुुविधा आजवर फेसबुकवर उपलब्ध करण्यात आली नव्हती. गेल्याच महिन्यात फेसबुक या प्रकारची चाचणी घेत असल्याचे वृत्त समोर आले होते. यावर आता मार्क झुकरबर्ग यांनी अधिकृतपणे भाष्य करत शिक्कामोर्तब केले आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवरील आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून या सर्व प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. यात त्यांनी आपण युरोप आणि अमेरिकेतील काही प्रकाशकांसाठी पेड सबस्क्रीप्शनची चाचणी सुरू केल्याचे जाहीर केले आहे. यात फेसबुक पेजवर शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर संबंधीत वृत्त पुर्णपणे वाचण्यासाठी अमुक-तमुक रक्कम भरण्याचे सूचित करण्यात येईल. यानंतर विहीत रक्कम अदा केल्यानंतर ते वृत्त वाचण्यासाठी खुले होईल. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत फेसबुक एका पैशाचीही आकारणी करणार नसल्याचे झुकरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियातील बहुतांश कंटेंट हे अगदी मोफत उपलब्ध होत असल्यामुळे प्रकाशकांसमोर उत्पन्नाचे आव्हान होते. यामुळे हे फिचर अतिशय महत्वाचे मानले जात आहे. येत्या काळात ही सुविधा जगभरातील मीडिया हाऊसेसला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, झुकरबर्ग यांनी जगभरातील प्रकाशकांसाठी एक अभिनव सुविधा देण्याची घोषणा केली आहे. यात ट्रेंडींग न्यूज या विभागातील बातम्यांच्या शीर्षकासमोर त्या कंपनीचा लोगो दिसणार आहे. यामुळे संबंधीत वृत्त नेमके कोणत्या प्रकाशन संस्थेचे आहे? याची माहिती मिळणार आहे.