fbpx

मोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव!

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र आणि राजस्थान सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जयपूरमध्ये आज संवाद साधणार आहेत. त्यासाठी मोदी जयपूरमध्ये दाखलही झाले आहेत. यासाठी तब्बल सव्वा दोन लाख लाभार्थी जयपूरमध्ये आले आहेत. मात्र काळी ओढणी काळी पँट, काळा रुमाल, काळी टोपी घालून आलेल्यांना कार्यक्रमात जाण्यास बंदी घातली आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्यान कोणी आंदोलन किंवा निषेध करु नये, केवळ यासाठी ही जबाबदारी घेतली जात आहे.

काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमस्थळी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मोदींच्या कार्यक्रमासाठी कोणी काळा शर्ट, काळे मोजे, काळी पँट घालून आलं आहे. याशिवाय अनेक महिलांकडे काळ्या रंगाची ओढणी आहे. कार्यक्रमस्थळाच्या प्रवेशद्वारावर अनेकांचे काळे कपडे काढून घेतले जात आहेत. बुरखा परिधान करुन आलेल्या मुस्लिम महिलांना कार्यक्रम स्थळावरुन परत जावं लागलं. या कार्यक्रमासाठी अतिशय चोख सुरक्षा व्यवस्था असून अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर्स लावण्यात आले आहेत. या मेटल डिटेक्टर्सजवळ काळ्या कपड्यांचा ढिग जमा झाला आहे.

अनेकजण शनिवारी काळे कपडे परिधान करतात. अशा लोकांना सरकारच्या या अजब नियमाचा फटका बसला आहे. राज्य सरकारनं याबद्दलच्या जाहिराती देताना, त्यामध्ये ‘काळे कपडे परिधान करुन कार्यक्रमाला येऊ नका’, अशी सूचना द्यायला हवी होती.यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. या कार्यक्रमासाठी काहीजण 300 ते 400 किलोमीटर प्रवास करुन आले होते मात्र . त्यांनादेखील याचा फटका बसला.