येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका

blank

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. मात्र आता ‘येवले अमृततुल्य चहा’ला अन्न आणि औषध प्रशासनाने दणका  दिला आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आलं आहे.

यापूर्वी देखील येवले चहावर अन्न आणि औषध प्रशासनाने येवले चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते. या जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो. केंद्रीय प्रयोग शाळेने हा अहवाल दिला आहे.

यापूर्वीही अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते. त्यामुळे चहाप्रेमी काहीसे नाराज झाले होते. पण चहामध्ये पुन्हा भेसळ आढळल्यामुळे आता यावर कारवाई करण्यात येणार आहे.