फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला हिंदुत्त्ववादी संघटनांचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. दिब्रिटो यांच्या निवडीच्या निर्णयाचे स्वागत होत असताना विश्व हिंदू परिषद आणि ब्राम्हण महासंघाने त्यांच्या निवडीला मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. या दोन संघटनांनी केलेल्या विरोधामुळे राज्यात नवा वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. तसेच राज्य शासनाने दिब्रिटो यांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रद्द करावे अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटनांनी केली आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची रविवारी निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र दिब्रिटो हे सक्तीने धर्मांतर करतात आणि त्यांनी हिंदू संतांचे विचार अंगिकारले नाहीत. या शब्दात विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हामंत्री नितीन वाटकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. इतकेच नव्हे तर संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटो यांची निवड करणे म्हणजे साहित्याकांच्या दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे सांगत वाटकर यांनी मराठी साहित्यिकांवरही टीका केली आहे.

याशिवाय हिंदुत्त्ववादी संघटनेचे आनंद दवे यांनीदेखील दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले कि, मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या, मराठी साहित्याचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिकांमधून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड केली जाते. मात्र मराठी साहित्यात दिब्रिटो यांचं काम शून्य आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या लेखनातून मराठी साहित्यातील कोणताही विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचविल्याचे आढळून येत नाही, त्यांची आजवरची सर्व पुस्तकं ही ख्रिस्ती धर्मावर आधारित आहेत.

दरम्यान आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे आदी साहित्यिकांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत होती. यात चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला होता. त्यामुळे मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती देण्यात आली आहे. आगामी संमेलन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साहित्य सोहळा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या