शेतकऱ्याच्या मुलालाही आरक्षण मिळायला हवे : आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या जनआशीर्वाद यात्रेवर आहेत. या अंतर्गत जय हिंद महाविद्यालयात ‘आदित्य संवाद’ हा कार्यक्रम या आयोजित करण्यात आला होता. यात आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याच वेगाने आपले शिक्षणही विकसित झाले पाहिजे. महाविद्यालयीन तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतो त्या वेळी त्याचे शिक्षण आणि नोकरीचे स्वरूप यात ताळमेळ बसत नाही. साहजिकच शिक्षितांची संख्या जास्त आणि नोकऱ्यांची उपलब्धता कमी अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. सर्वांच्याच आरक्षणाचा विचार होत असताना शेतकऱ्याच्या मुलाच्या आरक्षणाचा विचार होत नाही ही गोष्ट खरी आहे. शेतकऱ्याच्या मुलास आरक्षण कसे देता येईल याचा मी नक्कीच विचार करेन असं विधान केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी जनआशीर्वाद यात्रा ही मते मागण्यासाठीची निवडणूक प्रचारफेरी नाही… शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला यांच्यासह सर्वसामान्यांचा दबलेला आवाज ऐकण्यासाठी, तो बुलंद करण्यासाठी मी राज्यभर निघालोय. तुमच्या मनातलं, काळजातलं ऐकून घेऊन न्याय देणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.