राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी नेत्यांना पूर्वकल्पना होती; राजभवनाचे स्पष्टीकरण

bhagatsingh koshyari

मुंबई : रविवारी संध्याकाळपासून आझाद मैदानात धरणे धरणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, मोठ्या संख्येने हे मोर्चेकरी राजभवनाच्या दिशेने निघाल्याने पोलिसांनी या आंदोलकांना अडवलं होतं. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी गोव्यात गेले आहेत.

त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते अनेक शेतकऱ्यांनी देखील सडकून टीका केली. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही अशी टीका शरद पवार यांनी केली होती. मात्र, ज्यावेळी संयुक्त शेतकरी मोर्चाकडून परवानगी मागण्यासाठी पत्र पाठवण्यात आले त्याच दिवशी राजभवन कार्यालयाकडून राज्यपाल हे पूर्वनियोजित दौऱ्यामुळे भेटू शकणार नसल्याचे फोनद्वारे तसेच लेखी देखील कळवल्याचं समोर आलं आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला होता. यानंतर, राजभवनाकडून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते सोमवारी गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असं राज भवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक श्री प्रकाश रेडडी यांना 24 जानेवारीला पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळयाल्याचे मान्य केले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हा दावा चुकीचा आहे, असं देखील सांगण्यात आलं आहे.

इतकंच नाही तर, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून 25 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असेही धनंजय शिंदे यांना कळविण्यात आले होते व तसे स्विकृत असल्याबददल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते.

महत्वाच्या बातम्या