fbpx

शिवराज्याभिषेक सोहळ्यात राजसदरेवर बसण्याचा बहुमान शेतकरी कुटुंबाला

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंच्या सोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाला देण्यात आला आहे. या बहुमानाने शिवरायांचे खरे विचार आचरणात आल्याचं बोललं जातं आहे.

 

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहिले होते. बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. राज्यातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग होता. तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. या वेळी इतिहास अभ्यासक राम यादव यांच्या दुर्गराज रायगड परिचित-अपरिचित स्थळांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यात १२ बलुतेदार आणि १८आलुतेदार अशा सर्व जाती-धर्मीयांचा सहभाग झाले होते. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता, मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीची सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार झाले. यावेळी खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.