fbpx

शेतकऱ्यांच्या जातीलाच ‘मोदीआळी’ लागली

गंगाखेड – बोंडआळींना अनुदान घोषित करून दीडकी न दिलेल्या सरकारवरील शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. कापसावर बोंडआळी नाही तर सबंध शेतकऱ्यांच्या जातीलाच ‘मोदीआळी’ लागल्याचा उल्लेख एका शेतकऱ्याने जिंतूरच्या सभेत केला असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्ला चढवला. ते राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होते.

यावेळी मुंडे म्हणले की, महाराष्ट्र दुष्काळात होरपळू लागला आहे. गावागावात टॅंकरची सोय केलेली नाही आणि जलयुक्त शिवार योजनेची जाहिरातबाजी तर अशी केली आहे की राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र जलमय आहे. अहो खरंय, यांच्या राज्यात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले म्हणतात. आंदोलनं चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती अशी वाच्यता करतात. मात्र हा शेतकरी वर्ग तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,असेही मुंडे यावेळी म्हणले.