जमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक

पालघर / रविंद्र साळवे – जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा या शेतकऱ्याच्या मागणीला धुडकावून सूर्या प्रादेशिक जलवाहिनीचे खोदकाम सुरू करण्यात आल्याने त्याला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करत त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाच आंदोलक शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा-भायंदर, वसई- विरार महापालिका आणि २७ गावासाठी एमएमआरडीए मार्फत ४०३ एम. एल. डी क्षमतेची पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. दिवाळीनंतर योजनेच्या खोदकामास महामार्गावरील हालोली गावात सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी वारंवार विरोध करीत हे काम बंद पाडले . पुढे वाडा-खडकोना गावात हे काम सुरू करण्यात आले, या कामास आदिवासी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आणि काम बंद पाडले.आधी जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा अशी या शेतकऱ्यांची सुरुवातीपासून मागणी आहे

या आधी दोन दिवसांपूर्वी दुर्वेस येथे सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जलवाहिनीच्या खोदकामास ठेकेदार एल.एन्ड.टी कंपनी मार्फत सुरुवात करण्यात आली . येथील आदिवासी शेतकरी व ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला त्यानंतर मनोरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी मध्यस्थी करीत एमएमआरडीएला काम बंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार गेले दोन दिवस हे काम बंद होते.

या दरम्यान आंदोलकानी पालघरचे जिल्हाधिकारी भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्या पुढे मांडले व आंदोलक व अधिकारी यांची बैठक घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत शुक्रवारी सायंकाळी चर्चा करत १७ जानेवारी रोजी, राष्ट्रीय महामार्ग मार्ग प्राधिकरण, एम.एम.आर.डी.ए, वनविभाग व शेतकरी ग्रामस्थ आदींची उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत तोडगा न निघाल्यास मंगळवारी (ता. 22) जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असे ठरले . तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली व तसे आश्वासनही दिले गेले.

एमएमआरडीए ने आज दुर्वेस येथे पोलीस बंदोबस्तात या जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू केले, त्यामुळे येथील शेतकऱ्याांनी याला विरोध केला, विरोध करण्यास गेलेल्या आंदोलकांविरोधात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये मनोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे

एमएमआरडीए आणि ठेकेदार कंपनी एल अँड टी विरोधात शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी मनोर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखलही पोलिसांनी घेतली नाही नाही. मात्र एमएमआरडीएच्या तक्रारीची दखल घेत पाच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका बाजूला चर्चा करून आपण तोडगा काढणार असे आश्वासन आदिवासी, शेतकरी, ग्रामस्थांना दिले असतानाच, दुसऱ्या बाजूला मात्र पोलीस बळाचा वापर करून जलवाहिनीचे काम सुरू ठेवण्याची दुटप्पी भूमिका प्रशासन घेत आहे. तसेच पोलीस बळाचा वापर करून प्रशासन दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे

महत्त्वाच्या बातम्या :