पुरात वाहून गेलेल्या जनावरांचा मिळणार मोबदला, उपचारही मोफत : जानकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना पूर आला आहे. या पुरात नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांचे पशुधन वाचवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी सरकारने अजून एक घोषणा केली आहे.

पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. जानकर यांनी ‘पुरात वाहून गेलेल्या मोठ्या जनावराच्या मोबदल्यात ३० हजार रुपये, तर लहान जनावराच्या मोबदल्यात १६ हजार रुपये तर शेळी – मेंढीसाठी ३ हजार रुपये राज्य शासनातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.

पुढे बोलताना जानकर यांनी ‘राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या २० डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात काम करत आहे. तसेच केरळचे १० पशुवैद्यकीय डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. पूरग्रस्त भागातील सर्व जनावरांवर मोफत उपचारासोबतच औषधं, लसीकरणही विनामोबदला देणार असल्याचंही जानकर यांनी सांगितले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.