कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली – तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव असून अंजनी येथील विकास सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते.

अंजनी गावातच जालिंदर पाटील यांची दहा एकर शेती आहे. मात्र पाण्याअभावी त्यांनी केवळ साडे तीन एकर शेतात द्राक्षबाग केली होती. या द्राक्षबागेची छाटणी आवश्यक होती. परंतु पाणी नसल्याने त्यांनी द्राक्ष छाटणी लांबणीवर ढकलली होती. अशातच त्यांनी विकास सोसायटीकडून १३ लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज थकीत गेल्याने जालिंदर पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच या विकास सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

याशिवाय गावातीलच काहीजणांकडून त्यांनी हातउसने तीन ते चार लाख रूपये घेतले होते.  या सर्वांकडून वारंवार पैशाची मागणी होत असल्याने जालिंदर पाटील गत दहा दिवसापासून प्रचंड नैराश्येत होते. या नैराश्यातूनच त्यांनी सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून विषारी औषध प्राशन केले. काही कालावधीने घरातील अन्य सदस्य परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.