केंद्राने शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याचा दावा खोटा, शेतकरी नेते तुपकर यांचा आरोप

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने हमीभावात वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा करणाऱ्या केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेली ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. या संदर्भात केंद्र सरकारने उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ केल्याचा केलेला दावा खोटा आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. कारण उत्पादन खर्च काढताना केंद्र सरकारने त्यात हातचलाखी केली आहे. त्यांनी एकदा उत्पादन खर्चाची व्याख्या स्पष्ट करावी. यावर्षी वीजेचे, खताचे, बि-बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्च वाढलेला आहे. मात्र केंद्र सरकारने तो कमी दाखवला आहे. सोयाबीनचा हेक्टरी उत्पादन खर्च केंद्र सरकारने रु.२६३३ काढला आहे. मी केंद्रीय कृषिमंत्र्यांना आव्हान करतो की त्यांनी २६३३ रुपयांत हेक्टरी सोयाबीन पिकवून दाखवावं. दुसरीकडे हमीभावाचं संरक्षणच केंद्र सरकारने तीन कृषी कायद्यांमध्ये काढून घेतलं आहे. हमीभावात खरंतर वाढ करण्याची गरज होती. मात्र हातचलाखी करून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे.’

शेती विषयक तयार करण्यात आलेल्या तीन कायद्यांना शेतकरी संघटना विरोध करत आहेत. त्यातच काही संघटनांनी हमीभाव संरक्षण केंद्र सरकार संपवणार असल्याचा आरोप केलाय. मात्र, तसा कोणताच प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात येतेय. त्यातच आता महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावाला विरोध करण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP