परभणीच्या ‘त्या’ शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले…

परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र हिंगोलीतील एका शेतकऱ्यांच्या शेतातील संत्री घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडविल्यानंतर संबधित शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच मेसेज केला. त्यानंतर घडलेला प्रकाराची संपूर्ण राज्यात सध्या चर्चा सुरु आहे.

हिंगोलीतील जवळाबाजार येथील शेतकरी भाऊ पाटील यांनी शेतात संत्रीची फळबाग आहे. उत्पादित संत्रीचा माल एका ट्रकमध्ये भरून त्यांना बंगळुरू येथे पाठवायचा होता. परंतू कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आलेल्या आहेत. त्याच बरोबर संचारबंदी देखील लागू आहे. भाऊ पाटील यांच्या संत्र्यांचा ट्रक बंगळूरूच्या दिशेने निघाला. परंतू हिंगोली जिल्हा सोडताच झीरोफाटा (जि.परभणी) येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी हा ट्रक अडविला. त्या ठिकाणी एक ते दिड तास हा ट्रक उभा होता. कसे बसे त्या ठिकाणावरून ट्रक सुटल्यानंतर परत हा ट्रक ढालेगाव, ता.पाथरी येथील सीमेवर आडविण्यात आला.

वारंवार ट्रक आडविला जात असल्याने ट्रकमध्ये भरलेला 9 टन संत्रा खराब होईल याची भिती पाटलांना लागून राहीली होती. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसएमएस केला. मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने या एसएमएसची दखल घेत परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोनद्वारे शेतकऱ्यांची अडवून करू नका ,असे सांगून ट्रक सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपाध्याय यांनीदेखील परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना फोन करून ट्रक सोडण्याचे सांगितले. पोलिस अधिक्षकांनी पाटलांशी संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती घेतली व ट्रक यापुढे आडविला जाणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे सांगितले.