कर्जमाफीसाठी अर्ज भरताना शेतकरी संभ्रमात

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरताना यामध्ये महापालिका क्षेत्रातील विकास संस्था व गावांचा समावेश नसल्यामुळे या भागातील कर्जमाफीस पात्र असणारे शेतकरी संगणक सुविधा केंद्रावर गेल्यानंतर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शासकीय पातळीवरूनही याबाबत  माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्य सरकारने बॅंकांच्या माध्यमातून कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना छापील अर्जांचे वाटप केले आहे. या शेतकऱ्यांनी गट सचीव किंवा बॅंकेच्या प्रतिनिधीकडून ते अर्ज भरून घेतल्यानंतर ती माहिती जवळच्या संगणक सुविधा केंद्रातून ऑनलाईन भरून द्यायची आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून संबंधित बॅंकेत जमा करणे, अशी कर्जमाफीच्या अर्जाची पक्रिया आहे.

नाशिक महापालिका हद्दीतील गावांमध्येही शेतकरी मोठ्या संख्येने शेती करीत असून त्यांच्या विकास संस्था कार्यरत आहेत. या गावांमधील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा अर्ज विकास संस्थांमधून भरून घेतल्यानंतर ते संगणत सुविधा केंद्रात गेल्यानंतर तेथे अर्जाची माहिती भरताना शोधाव्या लागणाऱ्या पर्यायांमध्ये त्यांच्या गावाचे व विकास संस्थेचे नावच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संगणक सुविधा केंद्राच्या संचालकांनी महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या त्रुटी लक्षात आणून दिली,परंतु त्यात सुधारण करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले.

या शेतकऱ्यांमध्ये मात्र या मुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या गावातील विकास संस्थेचे नाव नाही म्हणजे आपल्याला कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्‍न त्यांच्या मनात असून त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. या मुळे हे शेतकरी संगणक सुविधा केंद्रात वारंवार चकरा मारून नाव आले का म्हणून विचारत असतात. परंतु त्यांचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. एका संगणक सुविधा केंद्र संचालकाने सांगितले की, नाशिक महापालिकेप्रमाणेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील विकास संस्ही अशीच समस्या आहे.