‘एफआरपी’ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक, साखर संकुल ताब्यात घेण्याचा केला प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफआरपीच्या प्रश्नावरून बच्चू कडू यांनी पुण्यात जोरदार आंदोलन केले आहे. या आंदोलनात आक्रमक प्रहार कार्यकर्त्यांनी साखर आयुक्त कार्यलयाचा ताबा घेतला आहे. तर आयुक्तालयाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली आहे.

याबाबत बच्चू कडू म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून कारखानदारांनी एफआरपीचा पहिला हफ्ता देखील अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत, कारखानदार त्यांना एफआरपी न दिल्याने हे आंदोलन छेडले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत थकलेले पैसे मिळाले नाहीतर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला.

दरम्यान ऊस कारखान्यात गेल्यावर नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत शेतकऱ्याचे पैसे मिळणे हे गरजेचे असते. मात्र २०१८-१९मधील सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अजूनही कारखान्यांकडे थकलेली आहे. त्यामुळे एफआरपीच्या प्रश्नावरून शेतकरी संतप्त झाले आहेत.