झेरॉक्स मशीनबाबत दिव्यांग अर्जदारांची समाज कल्याण विभागाकडून फसवणूक

सांगली दि.३१ : सन २०१७-१८ करिता जिल्हा परिषदचे समाज कल्याण विभागाकडून नरवीर उमाजी नाईक दिव्यांग स्वयंरोजगार स्वावलंबी योजनेअंतर्गत अपंग व्यक्ती करिता ३ % स्वीय निधीमधून झेरॉक्स मशीनसाठी ३३,००० रुपये अनुदानाकरिता ग्रामीण भागातून अनेकांनी अर्ज केले होते. विहित मुदतीत विविध तालुक्यातून एकूण ९८ अर्ज प्राप्त झाले होते. या योजनेअंतर्गत एकूण ४८ झेरॉक्स मशीन देण्यात येणार होते. सदर निवड प्रक्रियेत अनियमितता, अनागोंदी कारभार व राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप काही दिव्यांग अर्जदारांनी केला. या निवडी करिता कोणते निकष समाज कल्याण समितीने लावले याचे उत्तर आजअखेर पर्यंत समितीने दिले नाहीत.

पिडीत दिव्यांग मित्रांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्ते व स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टीसचे प्रमुख अमोल वेटम यांच्या नेतृत्वाखाली २८ मे रोजी जिल्हा परिषद समोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. समाज कल्याण अधिकारी व समितीने २८ मे रोजी लेखी आदेश पारित करून उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदारांना माहे ऑगस्ट २०१८ अखेर पर्यंत झेरॉक्स मशीन पुरवण्याबाबत लेखी आदेशाची प्रत दिली. यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही व उर्वरित दिव्यांग अर्जदारांची फसवणूक झाली आहे यामुळे १० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण छेडण्यात येणार असल्याची माहिती स्टुडंट फोरम फॉर सोशल जस्टीसचे प्रमुख अमोल वेटम, स्वप्नील खांडेकर, पिडीत दिव्यांग अर्जदार दत्तात्रय चौगुले, धानाप्पा सर्जे, सिद्र्या सौदागर, अर्चना माने, धानप्पा माने आदींनी दिले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुन्हा निवेदन सादर करण्यात आले आहे व याबाबत योग्य ती कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राउत यांनी १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनरल बॉडी बैठकीत हा मुद्दा मांडून उर्वरित दिव्यांग अर्जदारांना झेरॉक्स मशीनचा लाभ देऊ असे तोंडी आश्वासन दिले