‘खोट्या आरोपांमुळे त्यांना प्रसिद्धी व आनंद मिळतो, हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे’, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

‘खोट्या आरोपांमुळे त्यांना प्रसिद्धी व आनंद मिळतो, हा सेवाभाव आम्ही जोपासला आहे’, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

blank

चंद्रपूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगोला येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबीयांवर तोफ डागली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा आरोप केला. तसेच शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा प्रश्न केला. पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे आज चंद्रपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबीयावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांविषयी प्रतिक्रिया दिली. ‘किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. यापूर्वीदेखील असेच आरोप करण्यात आले होते. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते असे सांगण्यात येत होते. खोटे आरोप केल्यास त्यांना खूप प्रसिद्धी मिळते तसेच आनंद होतो. त्यामुळे हा सेवाभाव आम्ही जोपासतो’, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
‘अजित पवार यांनी आयकर विभागाचं धाडसत्र सुरु झाल्यावर सांगितले की, बहीणींच्या घरी धाडी का टाकल्या? त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. पण माझ्याकडे पुरावे आहेत की, जरंडेश्वर साखर कारखान्यांपासून ते अजित पवारांच्या ७० बेनामी आणि नामी संपत्तीत, त्या कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी आणि भावजींची भागीदारी आहे. अजित पवार तुम्ही राज्याशी बेईमानी केली. मग ती जनतेची केली की, बहिणीची केली. बहिणीच्या नावाने भागीदारी आणि संपत्ती आहे, आपण म्हणताय त्यांचा काही संबंध नाही. हे शरद पवारांना मान्य आहे का?’ असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

‘माझं शरद पवारांना चॅलेंज आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे मी उद्या ईडी आणि आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयालाही पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं चौकशीचे आदेशही दिले आहेत. यातील एकही कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी सिद्ध करून दाखवावे’ असे आव्हानही सोमय्या यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या