बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणी काँग्रेस आमदाराविरोधात गुन्हा दाखल

बंगळुरु – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत, बंगळुरुतील जालाहाल्ली भागातील एका अपार्टमेंटमधील घरातून जवळपास १० हजार बनावट मतदान ओळखपत्रे जप्त केली होती. दरम्यान आज पोलिसांनी बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणात विद्यमान काँग्रेस आमदारासह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस उरलेला असताना हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील उमेदवार आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार एन. मुनीरथना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्याच्या घडीला या प्रकरणावर काहीही बोलणे अयोग्य ठरेल. योग्यवेळी लोकांना यासंबंधी माहिती दिली जाईल असे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले.

मी मतदारसंघात मला मतदान करा, असा संदेश असलेली ४० हजार प्रसिद्धीपत्रके वाटली. तुम्हाला ही पत्रके प्रत्येक घरामध्ये मिळतील. ज्या फ्लॅटमध्ये बनावट मतदान ओळखपत्रे सापडली तिथे माझे प्रसिद्धी पत्रकही होते. म्हणून माझ्या नावाचा आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. हे संतापजनक असून मला अपमानित करुन त्रास देण्याच्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे असे काँग्रेस आमदार मुनीरथना यांनी सांगितले.