आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या कार्यक्रमातून काँग्रेस-राष्ट्रवादीला वगळले

mahavikas aaghadi

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच पालिका प्रशासनाकडून शहरात या महिन्यात विविध विकासकामांच्या लोकार्पणाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. शहरात शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते तर शनिवारी (दि.१६)पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र, या कार्यक्रमांचे निमंत्रण काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना आतापर्यंत मिळालेले नाही. याविषयी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांना विचारले असता, ‘महापालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला आहे. पक्षाचा कार्यक्रम नाही’ असे उत्तर त्यांनी दिले.

काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारसोबत असताना स्थानिक नेत्यांना बाजूला सारले जात असल्याने महाविकास आघाडीत नाराजी दिसून येत आहे. पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना व्यासपीठावर स्थान मिळाले नव्हते अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांना देखील आत्तापर्यंत निमंत्रण मिळालेले नाही.

काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी याविषयी म्हणाले, ‘महापालिका आयुक्त आम्हाला का डावलत आहे हे समजत नाही. याविषयी त्यांना जाब विचारणार आहोत. महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून विकासासाठी सामूहिक निर्णय घेतले जातात. याचे श्रेय फक्त शिवसेनेचे नाही’. असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या