फडणवीस-गडकरींनी मराठा समाजाला न्याय दिला : मेटे

नागपूर : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एका बैठकीत केला होता. त्यामुळे शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत काम करेल, मात्र बीड जिल्ह्यात काम करणार नाही, असा निर्णय शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतला होता.

भाजपमधील काही नेत्यांवर मेटे नाराज असले तरीही नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसंग्रामच्या जाहीर मेळाव्याचे काल आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्यात भाजपच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांवर मेटे यांनी स्तुतिसुमने उधळली.

शिवसंग्राम १७-१८ वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होती. मात्र त्यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवला. मराठा-कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडविला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे प्रतिपादन मेटे यांनी केले.