पूराचं राजकारण नको, सर्वांनी एकत्र येत पूरग्रस्तांना मदत करा : मुख्यमंत्री 

देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना फडणवीस यांनी ‘मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणीवा दाखवून द्या पण राजकारण करू नका’ अस आवाहन विरोधकांना केले आहे.

तसेच पुढे बोलताना निर्सगाच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही असे सांगितले. आपल्याकडे पाऊस नेमका किती मिलीमीटर पडणार हे आपल्याला समजू शकत नाही, तांत्रिकदृष्ट्या पावसाचं प्रमाण सांगितलं जातं. कोल्हापूर आणि सांगलीतील पावसामुळे गेल्या १०० वर्षातील पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. त्यामुळे नेमका पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही असं फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.