कर्नाटकमधील आमदार फडणवीसांनी फोडले, कॉंग्रेसचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. सत्ताधारी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कर्नाटकमधील सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. याविषयी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर टीका केली आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीचा देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न असून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. आमदार फोडायला आणि त्यांची पंचतारांकीत बडेजाव ठेवायला भाजपकडे एवढा पैसा कुठून आला? कर्नाटक सरकार पाडण्याचे काम त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. फडणवीसांनी गेले एक महिना कर्नाटकच्या आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवून हे तोडाफोडीचे काम केले’ अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसची लढाई फक्त निवडणुकीपुरती नसून देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.